|
|

आंगणेवाडीची यात्रा सोमवार, ८ फेब्रुवारी, २०१०
पत्रकारीतेच्या निमित्ताने काही वर्ष कोकणात राहिल्याने कोकणातल्या काही चालीरीती, यात्रा, ऊरुस याच्याशी संबंध आला. नंतर शासकीय सेवेमुळे कोकण समजून घेतांना या निमित्ताने वेगळा आनंद घेता आला. कालपासून मालवण मधील अंगणेवाडीतील श्री भराडी देवीची यात्रा सुरु झाली आणि माझ्या जुन्या स्मृतींना पुन्हा एकदा उजाळा मिळाला.
खरं तर कोकणातील आंगणेवाडीतील श्री भराडी देवीची यात्रा म्हणजे भक्ती भाव आणि यात्रा याचा संगमच होय. भराडी देवी ही आंगणेवाडीतील प्रसिद्ध असे एका अर्थाने ग्राम दैवत. या देवीबद्दल संपूर्ण कोकणात अनेक समज आहे. संकटात ही देवी धावून येते आणि आपल्या मनातील इच्छा पूर्ण करते असा समज आहे. यामुळे महाराष्ट्रातील कानाकोपर्यातून येथे मोठ्या प्रमाणावर भाविक जमतात.
या यात्रेचे वैशिष्ट्य म्हणजे मालवण परिसरातीलच नव्हे तर महाराष्ट्रातील लोक यात्रेला येतात. गेल्या चार-पाच वर्षापासून या यात्रेत शासनाच्या वतीने अनेक सेवा पुरवण्यात आल्या आहेत. त्यात सार्वजनिक आरोग्य सेवे बरोबर पिण्याचे पाणी, सार्वजनिक स्वच्छता यासारख्या सेवा देखिल पुरविण्यात आल्या आहेत. सुरक्षेसाठी व्हीडीओ कॅमेरे आणि यात्रा स्थळी असलेला कडक बंदोबस्त यामुळे भक्तीरसात न्हालेल्या आंगणेवाडीला एक वेगळा उत्साह प्राप्त झाला.
या यात्रेचे वैशिष्ट्य म्हणजे यंदाच्या वर्षी सिंधुदूर्ग प्रेरणोत्सव समितीच्या वतीने सिंधुदूर्ग किल्ल्याच्या तटबंदीविषयी आणि संवर्धनासाठी विशेष स्टॉल उभारण्यात आला आहे. या स्टॉलला मोठया प्रमाणावर गर्दी होते. देवीच्या दर्शनासाठी शुक्रवार रात्रीपासूनच भाविकांच्या मोठ्यारांगा दिसून येत होत्या. सर्व भाविकांना उत्तम पद्धतीने दर्शन घेता यावे म्हणून पाच रांगांची व्यवस्था करण्यात आली होती. कल्पकतेने उभारलेला उड्डाण पूल यामुळे कमी वेळात दर्शन घेणे शक्य झाले. यात्रेत मिठाई, कापड, विविध गृह उपयोगी वस्तू, मनोरंजनाची साधने, हॉटेल्स यामुळे कोट्यावधी रुपयाची उलाढाल झाली.
विशेष चौकशी केली असता सुरक्षेसाठी ५४७ पोलिस अधिकारी व कर्मचारी, राज्य राखीव दलाच्या दोन तुकड्या, दोन टॉवर वॉच, लायडिटेक्टर, ४० महिला पोलीस, २५० होमगार्ड अशी कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली. यावर्षीच श्री भराडीदेवीचे मंदिर संगमरवरी कलाकुसरीने सुशोभित करण्यात आली आहेत. या यात्रेचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे भाविकांच्या सोबतच राज्यातील अनेक अती महत्त्वाच्या व्यक्तींची यात्रेच्या स्थळी उपस्थिती होती. सिधुदूर्गचे पालकमंत्री तथा महसूल मंत्री हे प्रथेप्रमाणे आपल्या कुटूंब समवेत देवीचे दर्शन घेतात. यावर्षी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या पत्नी श्रीमती अमिता चव्हाण यांनीही श्रीभराडी देवीचे दर्शन घेऊन आशिर्वाद घेतले.
तंत्रज्ञानाच्या विकासामुळे प्रत्यक्ष न जाताही यात्रेतला आनंद घेता आला. पुढच्या वर्षी देवीने बोलवल्यास जाणे होईल अशी अपेक्षा करायला काय हरकत आहे.
डॉ. गणेश मुळे
'महान्यूज'मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.
|
|